कामशेत : भावासोबत घरात खेळत असताना 12 वर्षीय मुलाचा गळ्याला साडीच्या झोळीचा फास लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 7) सायंकाळी कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी येथे घडली.
दिनेश गुप्ता (वय 12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आफरिन वसीम खान (वय 24, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी बुद्धीलाल गुप्ता यांचे कुटुंब राहण्यास आहे. मयत दिनेश गुप्ता हा बुद्धीलाल गुप्ता यांचा मुलगा आहे. सोमवारी बुद्धीलाल त्यांच्या कामानिमित्त घराच्या बाहेरील गेटला कुलूप लावून बाहेर गेले होते.
त्यावेळी दिनेश त्याच्या लहान भावासोबत त्यांच्या घरात खेळत होता.
अचानक दिनेशच्या गळ्याला साडीचा गळफास लागला. हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकाच्या मदतीने गुप्ता यांच्या घराचे कुलूप तोडले. दिनेशला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे