पिंपरी ,८ जून-: पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.ॲाक्सफॅम सारख्या संस्था पुढे येवून अंध रहिवाशांना कोरोनाच्या काळात सहकार्याचा हात देत आहेत तसेच इतरांनीही पुढे यावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या व ॲाक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने निगडी ओटास्कीम परिसरांत राहणाऱ्या १५० अंध कुटूंबाना महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या
.
आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर ,दिव्यांग विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,ॲाक्सफॅम इंडियाचे प्रकल्प संचालक परमेश्वर पाटील,अंध संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर जोगदंड आदी उपस्थित होते.यावेळी सुमारे १५० अंध बांधवांना पंचवीस किलो तांदूळ ,पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी,गोडेतेल ,साखर व डाळी सह साबण व सॅनिटायझरचे वितरण यावेळी करण्यात आले.