पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत पिंपरी-चिंचवडमध्ये “खेलो इंडिया सेंटर” उभारण्याच्या मागणीसाठी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरन रिजिजू यांना साकडे घातले आहे. खेलो इंडिया सेंटरच्या उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आमदार जगताप यांनी दिली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरन रिजिजू यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत देशभरातील खेळाडूंसाठी सात राज्यांमध्ये १४३ “खेलो इंडिया सेंटर” उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारमार्फत पहिल्या टप्प्यात १४ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशभरात उभारण्यात येणाऱ्या १४३ “खेलो इंडिया सेंटर”मधील एक सेंटर पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात यावे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड हे एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधलेली आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात देशाचा नावलौकिक वाढवलेला आहे. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने पिंपरी-चिंचवडचे नाव देशपातळीवर गाजवलेले आहे.
शहरातील अनेक खेळाडूंमध्ये विविध क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. या क्षमतेला आणि त्यांच्यात असलेल्या खेळाच्या प्रतिभेला योग्य वयात चांगले प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी “खेलो इंडिया सेंटर” हे योग्य ठिकाण ठरेल. याठिकाणी खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देणारी साधणे व खेळाचे वातावरण असणार आहे. त्याचा शहरातील खेळाडूंना चांगला फायदा होईल. खेळाडूंमधील खिळाडू वृत्तीला चालना मिळेल. पुढे जाऊन हेच खेळाडू देशाची मान गौरवाने उंचावतील. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत पिंपरी-चिंचवडमध्ये “खेलो इंडिया सेंटर” उभारावे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची काही मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.”