- पालिकेचे आरोग्य केंद्रच नसल्याने पालकांची तारांबळ
- स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गाव कुदळवाडी आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. साधे आरोग्य सुविधा केंद्रही परिसरात नाही. तज्ञांनी तिसऱ्या कोरोना लाटेचा अंदाज वर्तविला आहे. यात सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुलांना साधे रोग प्रतिबंधक व बाह्य लसीकरणही होत नाही. फुकट असणाऱ्या डोससाठी खासगी रुग्णालयात पालकांना मोठी किंमत मोजावी लागते. अशाने गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या आरोग्याच्या अधिकाराचे हनन होत आहे. त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, असा गौप्यस्फोट ‘फ’ प्रभाग स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी केला आहे. तसेच वारंवार आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करूनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदन देताना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चौंधे उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र तिसऱ्या लाटेमुळे नागरिक भयभीत आहेत. मुलांचे महिनादर महिन्याला होणारे टीकाकरण ज्यात पोलिओ, बीसीजी, पेंटाव्हॅलंट, हिपेटायटिस ‘ए’, गोवर व इतर लसींचा समावेश आहे. मात्र, कुदळवाडीतील लहान मुलांना यापासूनही वंचित ठेवले जात आहे. या डोससाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय.
परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी. पर्यायाने दाट लोकसंख्या व आर्थिक दुर्बल लोक. येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे कामगार वस्तीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या चिखली घरकुल, जाधववाडी, संभाजीनगर व आकुर्डी रुग्णालयात जावे लागते. पालिकेची पर्यायी व्यवस्था नसल्याने अति गंभीर व तातडीच्या वेळी या रुग्णांची मोठी गैरसोय होते. गोरगरीब नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास आरोग्य सुविधांअभावी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बालकांना त्वरित डोस देण्याची व्यवस्था करावी. प्रलंबित आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आवश्यक बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.
”तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कुदळवाडीत आरोग्य केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा केला. आयुक्तांनी तात्पुरते आकुर्डी रूग्णालयामार्फत दर शुक्रवारी फिरते लसीकरण सत्र घेवून समुपदेशन व वैदयकिय उपचार दिले. पुढे त्यांनी आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणी व पाहणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक पाठविले. या पथकाने जागेची पाहणीही केली. आरोग्य केंद्र उभारणीबाबत सकरात्मक अहवाल वैद्यकीय संचालक तथा अति. आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविला. तत्कालीन आयुक्तांची बदली होताच त्याकडे साफ दुर्लक्ष झाले. वारंवार स्मरणपत्रे देऊनही, अद्याप प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही.”
– दिनेश यादव