शबनम न्युज / पिंपरी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण विभाग आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपच्या वतीने ऑनलाईन पर्यावरण प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोना साथीमुळे नागरिक आरोग्याप्रती सजग झाले आहेत. उत्तम आरोग्यासाठी शुद्ध पर्यावरणाची आवश्यकता आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणासंबंधी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभिनव स्पर्धेमध्ये एकूण १५ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत. १६व्या प्रश्नामध्ये ’स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट पर्यावरण’ या विषयावर १०० शब्दांत विचार मांडायचे आहे. १५ प्रश्नांचे प्राप्त गुण व १६व्या प्रश्नाचे स्मार्ट पर्यावरण यावरील उत्तर यांचा एकत्रित विचार करुन विजेता/विजेती घोषित करण्यात येईल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पर्यावरणपूरक भेट दिली जाईल. स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादावरून ३ किंवा ५ विजेते घोषित करून विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करून Survey / Polls या टॅबवर क्लिक करावे. त्यामध्ये Know Your Environment Quotient या पर्यायावर क्लिक करून आपण स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. या स्पर्धेचे नियम, अटी व शर्ती या महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व स्मार्ट सिटी लि. यांच्या अधीन असतील. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरण जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता मा. श्री. संजय कुलकर्णी यांनी केले आहे. नागरिक ३० जून, २०२१ पर्यंत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.