पिंपरी : पिंपळे साैदागर येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून तीन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी एजंट महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक विरोधी विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी शिवार चौक, रहाटणी येथील झिया थाई स्पा येथे ही कारवाई केली.
वैष्णवी दीपक पवार (वय २७, रा पिंपळे सौदागर), असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजन महाडिक यांनी मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवार चौकातील स्पॉट १८ मॉलमध्ये झिया थाई स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. तर एजंट असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल केला. दहा हजारांची रोकड, ११ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, तसेच २० रुपये किमतीचे साहित्य, असा २१ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला. एजंट महिला पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होती.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे