सोलापूर : तब्बल एक महिन्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजनाथ बोराडे (वय ३५ रा. विजयकुमार देशमुख नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी मृत्यूशी झुंज देत अखेर जगाचा निरोप घेतला. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.
राहुल बोराडे यांना एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता
त्यामुळे सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. कोरोनानंतर त्यांना फुप्फुसाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली होती. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. गेल्या आठवड्यात त्यांना पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी त्यांचे निधन झाले. फौजदार राहुल बोराडे हे काही महिन्यांपूर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ते फौजदारपर्यंत प्रवास
राहुल बोराडे हे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. काही दिवसातच ते एमपीएससीची परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) झाले होते. २०१७ मध्ये ते शहर पोलीस आयुक्तालयमध्ये रुजू झाले होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. पोलीस खात्यामध्ये आरोपीचा तपास लावणे, गुन्हे उघडकीस आणणे यामध्ये त्याने अनेक चांगल्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्या निधनाने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे