मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले.
तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.
मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.
दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे