पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. रस्ते खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. कोरोना परिस्थितीत महापालिका विकासकामांचे नियोजन कोलमडले असले तरी, प्रशासनाने पावसाळापूर्व कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची या कामासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे अन्य विभागाची सुरू असलेली अनुषंगिक कामे रखडली आहेत. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी पावसाळापूर्व नियोजित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. विविध विकासकामांच्या अनुषंगाने शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये खोदाई केलेली आहे. रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर अशा लाईन्स भूमिगत करण्याचे काम सुरू आहे.
सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केलेली आहे. डांगे चौक आणि कल्पतरू सोसायटीच्या समोरील मार्गावर ग्रेड सेपरेटर व अंडरपास करण्याचे काम सुरू आहे. अन्य भागातील रस्त्याची अनुषंगीक कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही कामे मार्गी लावण्यास अडथळा निर्माण होणार आहे. कामे पूर्ण न झाल्यास नागरिकांची खूपच तारांबळ होणार आहे. वाहतुकीला अडथळा होऊन त्याचा प्रशासनावर ताण पडणार आहे. यावर ऐनवेळी उपाय शोधत बसण्यापेक्षा वेळीच ही कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.
अशा भूमिगत कामांसाठी खोदकाम केल्यामुळे खड्डे तयार झाले आहेत. पाऊस पडल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीला व नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच, बरेच दिवस खड्ड्यात पाणी साचल्यास नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्यातील दूषित पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन शहराच्या विविध भागांमध्ये रोगराई पसरल्यास आरोग्य व्यवस्थेवर ताण पडणार आहे.
तसेच, मोठा पाऊस पडल्यास मोठ-मोठ्या नाल्यांमध्ये पाणी साचून ते नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामे तातडीने मार्गी लावावीत. आपात्कालीन परिस्थितीत नदीपात्रालगत राहणा-या नागरिकांचे स्थलांतर करण्याची व्यवस्था करावी. अन्य ठिकाणी त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. तत्पुर्वी, पावसाळापूर्व रखडलेली कामे त्वरीत मार्गी लावावीत, असेही मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.
*
अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंगचा बंदोबस्त करावा…
रस्त्याच्या आजुबाजुला मोठमोठे जाहिरात फ्लेक्स लावलेले आहेत. अधिकृत कमी आणि अनधिकृत फलकांची संख्या अधिक आहे. काहींचा लोखंडी सांगाडा कुजलेल्या अवस्थेत आहे. तर, काहींचे स्ट्रक्चर मोडकळीस आलेले आहे. मोठी वा-याची झुळूक आल्यास हे लोखंडी सांगाडे रस्त्यावर कोसळतील. यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तरी, जाहिरात फलकाचे रितसर ऑडीट करण्यात यावे. तसेच, पावसाळ्यात रस्त्याच्या कडेची व लोकवस्तीतील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. अशा झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही मोढवे-पाटील यांनी केली आहे.