शबनम न्युज / पिंपरी
ख्रिस्ती समाज आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाकडे गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद व अन्य संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा व मागणी करत आहे. परंतु प्रलंबित समस्या पहाता समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे का? हा समाजाचा प्रश्न आहे. समाजाला कायम गृहित धरले जाते ही समाज भावना आहे. या प्रश्न आणि भावनेच्या निराकरणासाठी ठोस नियोजन ही गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
निवेदनात भोसले पुढे म्हणाले की, देशातील विविध ख्रिस्ती संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न होत आहेत. परंतु पाहिजे तशी गती येत नाही. समाजातील महिलांचे प्रश्न, तरुणांची वाढती बेरोजगारी, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागणे, त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा आधारही दुबळा होत असून, अल्पसंख्यांक व इतर योजनेचा लाभ मिळवतानाही मोठी कसरतच करावी लागत आहे. याबरोबरच ख्रिस्ती संस्थांमध्ये सुद्धा समाजातील गरजू व्यक्तींचा सहभाग कटाक्षाने वाढावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षापासून सर्व पंथीयांना एकत्र आणून राज्यात मजबूत संघटनेची बांधणी होत आहे. समाजाला याचा आनंद आहे. आता राज्यकर्त्यांनी देखील जाणिवेने समाजाकडे लक्ष पुरविले पाहिजे. आज पर्यंत समाजाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. याची खंत वाटते. समाज राजकीय इच्छाशक्तीची वाट पहात आहे. म्हणूनच राज्यकर्त्यांनी तसेच ख्रिस्ती संस्थांनी देखील न्याय्य भूमिकेतून समाजाकडे पहावे, अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष डेव्हिड काळे यांनी करून लवकरच अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री व महा विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटून त्यांचे लक्ष वेदनार असल्याचे राज्य सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर यांनी यावेळी सांगितले.