शबनम न्युज / मुंबई
महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल याचीही व्यक्त केली खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आज साजरा होतोय. यानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी २२ वर्षांतील आठवणी जागवत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.
आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र पक्ष उभारणीचा निर्णय घेतला. संघटना स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला, त्याला जनमानसाने पाठिंबा दिला. या वर्षांमध्ये काही धक्के बसले. मात्र आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु राहिली. आज त्याचा आढावा घेण्याचा दिवस असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमाच्या बळावर आपण २२ वर्षे महाराष्ट्रात काम करु शकलो. यापैकी १७ वर्षे आपण सत्तेत राहिलो. आजच्या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यास नवीन सहकारी सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे समाधान आहे.मागील वर्षी कोरोनाचे संकट संबंध देशावर आले. या महामारीत राज्य मंत्रिमंडळातील पक्षाच्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. नव्या नेतृत्वाची फळी उभी करुन संपूर्ण राज्याला विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. आज आपण राज्यात सत्तेत आहोत. सरकार चालवणे महत्त्वाचे आहेच, त्यासोबत संघटनेत नवे नेतृत्व निर्माण करण्याचे काम सुरु ठेवलेच पाहीजे. १० जून १९९९ रोजी आपण शिवाजी पार्कवर जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सार्थ ठरविण्याचे काम राज्यातील सामान्य जनतेने केले. त्यामुळे त्या सामान्यांच्या पाठिशी नेहमीच ठामपणे उभे राहिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक घटकाचा विचार करणारा पक्ष आहे, यादृष्टीने आपल्याला प्रत्येक निर्णय घ्यायचा आहे. हा पक्ष प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे, असे काम आपल्याला करत राहायचे आहे. आपण सर्वांनी सुरू केलेल्या कामाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळो,अशी आशा व्यक्त करत पवार यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल पटेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे आणि पक्षाचे इतर मंत्री, फ्रंटल संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.