पिंपरी – जागतिक बालकामगार विरोधी दिवस” लहान मुलांना खाऊ देऊन साजरा करण्यात आला , दरवर्षी १२ जून रोजी ‘जागतिक बालकामगार विरोधी दिवस’ साजरा केला जातो. १४ वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे यांनी या वेळी केले.
जगभरात अनेक लहान मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या बालपणाचा आनंद घेता येत नाही, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा अधिकार मिळत नाही, त्यापासून त्यांना वंचित रहावं लागतंय. आई वडील अशिक्षित असल्याने ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असल्यामुळे त्यांच्या लेकरांना शाळेमध्ये घालण्यास त्यांच्याकडे पुरेसे पैसे शिल्लक राहत नाही, त्यामुळे ते आपल्या मुलांना मोलमजुरी करण्यास पाठवितात.
‘जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे’ औचित्य साधून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा भार वाहणाऱ्या मजुरांच्या लहान मुलांना व्हेज पुलाव व खाऊ वाटण्यात आला. या वेळी पा.बन्यामिन काळे यांनी लहान लेकरांना एकत्र करून शिक्षण, स्वच्छता व आरोग्य बाबत महत्त्व पटवून दिले व या बाबत कसे दक्ष रहावे याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी व त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करून अशा दुर्बल घटकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून जागृत केले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ब्र.डेव्हिड काळे यांनी या वेळी केले.