शबनम न्युज / पुणे
राज्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’साठी ७५ हजारांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
येथील व्हि.व्हि.आय.पी. सर्कीट हाऊसच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश संस्थेच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस कल्याण संस्थेचे राज्याचे अध्यक्ष सुरेश कमलाकर, पुणे जिल्हाध्यक्ष तथा निवृत्त सहायक पोलीस आयुक्त विनायकराव जाधव, खजीनदार श्रीकांत पाटील, सचिव ए. ए. खान, शरद पवार, राजेंद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
करोना विरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्यावतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्याला बळकटी देण्यासाठी तसेच सामाजिक दायित्व म्हणून निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्यावतीने स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’साठी ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संस्थेच्यावतीने देण्यात आला. पोलीसांच्या निवृत्त कल्याण संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, सभासदांचे आभार मानले.
यावेळी निवृत्त पोलीस कल्याण संस्थेचा वार्षिक अंक तसेच निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनायकराव जाधव लिखीत पोलीस आणि शेतकरी यांच्या जीवनावर आधारित कविता संग्रह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट देण्यात आला.