शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सेवेतील 25 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचार्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अशा कामगाराच्या निधनानंतर त्यांचे वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे देण्याकरिता नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शासन निर्णय पारित करण्यात आलेला होता. त्या नुसार 269 चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिका वाटपाचे धोरण शासनामार्फत निश्चित करण्यात आले असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले आहे.
शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या सदर योजनेचा लाभ महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळावा, याकरिता अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांमार्फत मागणी करण्यात येत होती. तसेच त्या अनुषंगाने वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात येत होता. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी सदर योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास दिले आहेत.
त्यानुसार शासन निर्णयाच्या अनुषंगाने महापालिकेमध्ये 25 वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेले अथवा मयत झालेले 83 कर्मचारी, त्यांचे वारस मोफत घरे मिळण्यास पात्र ठरत आहेत. त्याकरिता भूमी आणि जिंदगी विभागाकडील महापालिकेचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता राखीव असलेल्या सदनिकांपैकी 83 सदनिका प्राधान्याने सफाई कामगारांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर सदनिकांचे …. करून सोडत पद्धतीने सदर सदनिकांचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली आहे.