शबनम न्युज / कोल्हापूर
भक्षाच्या शोधात जंगलातून आलेल्या बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग केला. तथापी विहिरीत पडून दोघांचाही मृत्यू झाला.किल्ले पारगडच्या दक्षिणेकडे दोडामार्ग तालुका हद्दीत कोनाळ वन परिमंडळ कार्यक्षेत्रात येणाऱ्या तिलारीवाडी येथील किशोर शेट्ये यांच्या घरालगतच्या विहिरीत ही घटना घडली. “शिकार करने आया था, खुदही शिकार हो गया!” या उक्तीची या घटनेने प्रचिती आणून दिली.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल पानपट्टे व वनपाल शिरवलकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
मृत बिबट्या व कुत्रा बाहेर काढले. शेट्टी यांनी पायऱ्या नसलेल्या या विहिरीत मोटर पंप बसवला असल्याने विहिरीकडे सहसा कोण जात नाही; पण दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली असता हा प्रकार लक्षात आला. मृत्यू झालेला बिबट्या सात ते आठ वर्षाचा पूर्ण वाढ झालेला असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याला दफन करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रीतम पोकळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंधरा दिवसापूर्वी किल्ले पारगड नजीकच्या तेरवन येथे बिबट्याने गोठ्यातील गाईला ठार केले होते. तिलारी राखीव जंगलक्षेत्रात बिबट्या, वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.