शबनम न्युज / पुणे
काँग्रेसला सोबत घेऊनच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील पर्यायी शक्ती आघाडी उभी करण्याची आवश्यकता आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. या आघाडीसाठी सामूहिक नेतृत्व असेल असेही पवार यांनी सांगितले. शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाला पवार यांनी शुक्रवारी प्रथमच भेट दिली. यावेळी रामटेकचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे असेल अशी चर्चा आहे. याबाबत पवार म्हणाले, आघाडीचे नेतृत्वाबाबत सध्या चर्चा केली नाही. आम्हाला सामूहिक नेतृत्व समोर ठेवून जावे लागेल. असे त्यांनी नमूद केले. आघाडीला मदत करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना शक्ती देणे, सर्वांना एकसंघ ठेवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. दिल्ली येथे झालेली बैठक प्रामुख्याने गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत होती. त्यात कोणताही राजकीय अजेंडा नव्हता. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ईडी कडून अनिल देशमुख यांच्या केल्या जाणाऱ्या चौकशीबाबत विचारले असता, ती कारवाई आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही अशा प्रकारांना घाबरत नाही. असे शरद पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. यापूर्वीही देशमुख यांची केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली आहे. त्यांच्या मुलाच्या व्यवसायाचे ही चौकशी झाली आहे. त्यातून यंत्रणांच्या हाती काही लागले नाही. त्या नैराश्यातून त्रास देण्याचा प्रयत्न या द्वारे केला जात आहे. ईडी द्वारे सूड घेण्याचा नवा पायंडा राज्यकर्त्यांनी पाडला आहे. असेही पवार यांनी सांगितले.