- मलई खायला मिळत नसल्यामुळे भाजपाच्या कामांमध्ये हस्तक्षेप
- निगडी पुलाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचा घेतला खरपूस समाचार
शबनम न्यूज / पिंपरी
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आल्याने याचे श्रेय लाटण्याची हाव सुटलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी आज बुधवारी (दि. ३०) रोजी पुलाचे घाईघाईत उद्घाटन केले. विकासकामांच्या भूलथापा मारून पंधरा वर्षे पिंपरी-चिंचवडकरांना लूटणा-या राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी निगडीतील पुलाची अनुषंगीक कामे पूर्ण होण्याअगोदरच हा पूल सुरू केल्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्वतःची ओळख ‘कमर्सियल’ विरोधी पक्षनेता करून ठेवलेल्या राजू मिसाळांनी अन्य कामांमध्ये मलई खायला मिळत नसल्यामुळे भाजपाने गेल्या चार वर्षात पूर्ण केलेल्या महत्वाकांक्षी पुलाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी मिसाळांचा खरपूस समाचार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहराच्या वैभवात भर पाडणारा पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर दुमजली उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर तयार केला. त्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून काही अनुषंगीक कामे सध्या सुरू आहेत. पूल सुरू केल्यानंतर ही कामे सुरू ठेवल्यास वाहतुकीला अडथळा होऊन छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. नाहक सामान्य वाहनचालकांच्या जीवाला धोका नको, याचा विचार करून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पुलाचे उद्घाटन पुढे ढकलले होते. येत्या काही दिवसांत अनुषंगीक कामे पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार होता. त्याचे नियोजन देखील महापालिका प्रशासनाने केले आहे. हे विरोधी पक्षनेत्यांना ज्ञात असुनदेखील केवळ श्रेय लाटण्यासाठी त्यांनी पुलाचे उद्घाटन केले आहे. प्रत्येक विकासकामांच्या निविदेत लक्ष घालून ठेकेदारांना वेठीस धरणा-या विरोधी पक्षनेत्याने भाजपाला आव्हान देण्याची हिम्मत दाखवू नये, ते खूप महागात पडेल, असा इशारा भाजपाचे मोरे यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेत्याचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही – मोरे
पालिका प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवण्याचे अज्ञान असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याला भाजपाच्या विकास कामांत हस्तक्षेप करण्याची विपरीत बुध्दी सूचली आहे. विरोधी पक्षनेता पद मिळाल्यापासून प्रभागातीलच नव्हे तर शहरातील कोणत्याही भागात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये डोके घालून ठेकेदारांना वेठीस धरणे हा त्यांचा नित्यकृम झाला आहे. पक्षाने हे पद लोकांची कामे करण्यासाठी दिले आहे. पैसे कमवण्यासाठी नाही. प्रत्येक विकास कामांच्या निविदेत हस्तक्षेप करून माझे काय ? असा प्रश्न करणा-या विरोधी पक्षनेत्याने स्वत-ची ओळख ‘कमर्सियल’ विरोधी पक्षनेता अशी केली आहे. गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून त्यांना एकही काम करता आले नाही म्हणून भाजपाच्या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी त्यांची जीवघेणी धडपड सुरू आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वाहनचालकांच्या जीवाचा विचार न करत पुलाचे उद्घाटन करणा-या विरोधी पक्षनेत्याचा कुटील डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा अनुप मोरे यांनी दिली आहे.