प्रतिनिधी / दिलीप सोनकांबळे
शबनम न्यूज / बीड
शेतातील काम आटोपून सायंकाळी घराकडे परतणाऱ्या विवाहित महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात घाटेवाडी येथे घडली. हा सर्व प्रकार शुक्रवारी (दि. २) रोजी घडला. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
घाटेवाडी येथे शक्रवारी एक विवाहित महिला शेतातील काम आटोपून घराकडे जात होती. यावेळी फुलचंद रामभाऊ गायकवाड याने बळजबरीने पीडितेस त्याच्या चारचाकी गाडीत (क्र. एमएच-०६/बीई-३००८) घालून अपहरण केले. यावेळी आरोपीने पीडित महिलेस शिवारातील शिंदी फाट्यावरील बाळू मामाच्या मंदिरा बाजूस असलेल्या शिंदे यांच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तिच्या नवऱ्यास व मुलास जीवे मारुन टाकण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली.
रविवारी (दि.४ जुलै) पीडित महिलेने तिच्यावर घडलेल्या अन्यायाची माहिती केज पोलीस ठाण्यात दिली. महिलेच्या तक्रारी वरुन फुलचंद गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले आहे.
प्रभारी पोलीस अधिकारी संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी या पुढील तपास करीत आहेत.