शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये चाईल्ड हेल्पलाईन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे, व सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत आज सोमवार दि.५ जुलै २०२१ रोजी गुगल मीटद्वारे ऑनलाईन करण्यात आला.
चाईल्ड हेल्पलाईनविषयी संक्षिप्त माहिती
सुमारे दीड ते दोन वर्षांपासून कोरोना या आजाराशी संपूर्ण विश्व झुंज देत आहे. त्याला पिंपरी – चिंचवड शहरही अपवाद नाही. यापूर्वी आलेल्या पहिल्या व दुसऱ्या कोरोनाच्या लाटांना समर्थपणे टक्कर देत आपले शहर नव्याने उभारी घेत आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने कोरोनाच्या विविध उपाययोजना करून कोरोनामधून नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. सद्यस्थितीत मनपा मार्फत विविध प्रकारच्या सुमारे पंधरा हेल्पलाईन सुरू आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे व ती लहान मुलांना धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड शहरातील लहान मुलांच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी तसेच करोनासंबंधी आरोग्य विषयक, सामाजिक, शाळेविषयी, खेळाविषयी त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आता चाइल्ड हेल्पलाईन द्वारा करण्यात येणार आहे. यामध्ये एच ए स्कूल, गेंदीबाई चोपडा शाळा, अण्णासाहेब मगर शाळा, ज्ञान प्रबोधिनी शाळा, सिटी प्राइड स्कूल, थेरगाव माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी राजे विद्यालय, पिंपळे गुरव शाळा अशा शाळांमधील सातवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी होत आहेत.
तसेच मनपाचे वैद्यकीय अधिकारी व मुलांचे पालक यांचे देखील यामध्ये सहकार्य राहणार आहे. या हेल्पलाईनद्वारे मुलेच मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे, तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या हेल्पलाइनचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी उद्युक्त करावे. हेल्पलाईन क्रमांक आहेत 7768800333 व 7768900333 तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, सदर हेल्पलाईनचा जास्तीत जास्त उपयोग करून मुलांमध्ये करोनाविषयी जागरूकता निर्माण करून, करोनाच्या तिस-या लाटे पासून त्यांना सुरक्षित ठेवण्यास सर्वतोपरी सहकार्य करावे.असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.