शबनम न्युज / वडगाव मावळ
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी बजेट मध्ये मावळ तालुक्यातील कान्हे उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर इमारत बांधकामासाठी 35 कोटी 52 लाख रुपये तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 14 कोटी 80 लाख रुपये असा एकूण 51 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
मावळ तालुक्यातील आरोग्य विषयक उपाययोजना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर माझा नेहमीच भर आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. असे आमदार शेळके म्हणाले.
आमदार शेळके यांनी मावळातील सर्वसामान्य नागरिकांना तालुक्यातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कान्हे व लोणावळा येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यानुसार दोन्ही रुग्णालयांना यापूर्वीच मंजुरी देखील मिळालेली होती. त्यातील लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयात निधी मिळाला असून, कामही सुरू झाले आहे. तर मंगळवारी (दि.6)अधिवेशनातील पुरवणी बजेटमध्ये कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर इमारत उभारणीसाठी 35 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच इतर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे.
विकास कामे प्रगती पथावर
तळेगाव दाभाडे नगरपरिषद नूतन प्रशासकीय इमारतीसाठी मागील वर्षी 4 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, पुरवणी बजेटमध्ये आणखी 14 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या इमारतीसाठी आता 18 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एकंदरीत पावसाळी अधिवेशनाचे पुरवणी बजेट मध्ये आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी सुमारे 51 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मिळाला असून, वर्षभराच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मावळ विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून अनेक विकास कामे प्रगतिपथावर असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.