शबनम न्युज / पिंपरी
पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवण्यासाठी बनावट अनुभव दाखले सादर केल्याप्रकरणी फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकारात हिन्दुस्तान अॅन्टीबायोटीक्स या कंपनीचा बनावट अनुभव दाखला सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी राजेश इंजिनियर्स आणि कंपनीच्या मालकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या प्रकारात पर्वती जल शुद्धीकरण केंद्राचा बनावट अनुभव दाखला सादर करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पहिल्या प्रकारात रामनाथ निवृत्ती टकले (वय 55, रा. रावेत) यांनी शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश इंजिनियर्स आणि कंपनीचे मालक रेवजी सहादु घाडगे (वय 69, रा. खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हिन्दुस्तान अॅन्टीबायोटीक्स या कंपनीचा बनावट अनुभव दाखला करुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 1 कोटी 2 लाख 91 हजार 982 रुपयांची पाणी पुरवठा विभागाची कामे मिळवून पालिकेची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.दुसऱ्या प्रकरणात प्रवीण विठ्ठल लडकत (वय 57, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी आज शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीव प्रिसीजनचे मालक संजीव यशवंत चिटणीस (वय 65, रा. बिबवेवाडी पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाणी पुरवठा विभागाची निवीदा मिळवण्यासाठी पर्वती जल शुद्धीकरण केंद्राचा बनावट अनुभव दाखला सादर करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.