‘घरोघरी लसीकरण’ मोहीम राबवा; लसींचा पुरवठाही वाढवा..- नगरसेविका जयश्री गावडे
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑनलाईन या जाचक अटीमुळे प्रभाग क्र. १९ मधील लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहत आहेत. स्लम भाग असल्यामुळे बहुतांशी नागरिकांचा इंटरनेटशी काडीचाही संबंध येत नाही. लसीकरण केंद्रावर नुसती गर्दी व गोंधळ उडतोय. पालिका आयुक्तांनी तात्काळ लसीकरणाची पद्धत बदलून प्रभाग १९ मध्ये ‘घरोघरी लसीकरण’ मोहीम राबवावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका जयश्री गावडे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील व आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या सर्व केंद्रांवर कोविड १९ चे लसीकरण सुरु आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंद करावी लागते. प्रभाग १९ मध्ये आनंदनगर, दळवीनगर, संतोषनगर, रेल्वेलाईन, विजयनगर, पत्राशेड, बौद्धनगर, रमाबाईनगर, आंबेडकरनगर, भिमनगर व सॅनेटरी चाळ या झोपडपट्ट्यांचा भाग येतोय. या भागातील बरेच नागरीक अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही.
तसेच लसीकरणासाठी कोविड सेंटरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने या नागरीकांची गैरसोयही होत असते. लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरवठाही मर्यादित होतोय. त्यामुळे नोंदणी न करता उपस्थित नागरीकांचे लसीकरण करणे शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी प्रभाग १९ मधील स्लम भागात ऑनलाईन पध्दतीऐवज ‘घरोघरी कोविड लसीकरण’ ही मोहीम राबवावी व नागरिकांना दिलासा द्यावा, असे या निवेदनात नगरसेविका गावडे यांनी म्हटले आहे.