शबनम न्यूज | पुणे
क्राईम | बातमीदार
पुणे – रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणून बसवून लूटमार करणाऱ्या चार सराईत आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. वसीम अजमल खान वय 31 , मोसिन खान नूर खान वय २८, अन्सार अयुब खान वय ३२, अब्दुल करिम बार्शीकर वय २६ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सेल्वम शंकरलिंगम पिल्ले वय ४८ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन जुलै रोजी पिल्ले हे दुपारी मार्केट यार्ड पुणे येथून अहिल्यादेवी चौक बालाजी नगर पुणे येथे जाण्यासाठी पॅसेंजर म्हणून रिक्षात बसले प्रवासादरम्यान त्यांना रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांनी धक्काबुक्की करून त्यांची सोन्याची चेन काढून घेतली व पसार झाले.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व युनूस मुलांनी यांच्या आधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर धाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे शिवनेरी नगर कोंढवा पुणे येथे असल्याचे समजले त्यानुसार सापळा रचून या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी ताब्यात घेताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच आरोपीकडून सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी दर्शविली आहे .आरोपींना सहकार पोलीस स्टेशन येथे आणून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली,