शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | बातमीदार
पिंपरी चिंचवड शहरामध्ये १ जुलै पासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. राजेश पाटील , महापौर मा. माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप , भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे याना दिले होते. परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध दर्शविला आहे . असे असताना हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे? असा सवाल अपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात आला असून. शनिवार पासून अपना वतन संघटनेच्या वतीने शहरातील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या व शहरातील आमदार , पक्षनेते ,विरोधीपक्षनेते यांच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहेत . याची सुरवात शनिवार दि. २४/०७/२०२१ रोजी मा. महापौर यांचे जनसंपर्क कार्यालय ,सांगवी गावठाण याठिकाणी लोकशाही व सनदशीर मार्गाने ठिय्या आंदोलन करून करण्यात येणार आहे .याची दखल वेळीच घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणायचा इशारा संघटनेने दिला आहे.