पिंपरी, दि. २३ जुलै २०२१ :- जपानमध्ये सुरु असणा-या ऑलिम्पिक स्पर्धेत शहराचे प्रतिनिधीत्व करणा-या आणि शहराच्या नावलौकिकात भर पाडणा-या खेळाडूंचा शहराला अभिमान वाटत आहे असे गौरवोद्गार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा अधिकारी आणि क्रीडा पर्यवेक्षक यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, उपआयुक्त संदीप खोत उपस्थित होते.
शहरातील नामवंत खेळाडू घडविणा-या क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, अनिता केदारी यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापौरांनी जपानमध्ये प्रतिनिधीत्व करणा-या खेळाडूंना त्यांच्या पर्यवेक्षकांना तसेच शहरातील सर्व क्रीडा शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.