शबनम न्यूज | मोशी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भारत मातेच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मोशी, भोसरी परिसरातील उद्योजक युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे आणि कर्तव्य सोशल फाउंडेशन च्या वतीने सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीचा आणि कोरोना महामारी काळामध्ये सेवा प्रदान करत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या वीरपत्नी यांचा सन्मान दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मोशी ग्रँड हॉटेल, मोशी येथे पार पडणार आहे. या प्रसंगी भारतीय सैन्याची बिग्रेडियर आर. सी. कटोच (विशिष्ट सेवा पदक), पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त आयर्न मॅन कृष्ण प्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी भारत मातेला अनोखी मानवंदना देण्याच्या उद्देशाने दिनांक 16 आणि 17 ऑगस्ट रोजी ‘भीम केक बेकिंग’ या अनोख्या “बेक द केक” स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोरोना कालावधीमध्ये लॉक डाऊन मुळे खचून न जाता मनाला उभारी देण्याच्या उद्देशाने अनेक महिला भगिनींनी केक बनवायचा छंद जोपासला होता. या हौशी कलावंतांना व्यासपीठ उभे करून देण्याची या स्पर्धेमागची भूमिका आहे. या थीम केक बेकिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी स्वच्छ भारत अभियान, कारगिल विजय, बेटी बचाव बेटी पढाव, सर्जिकल स्ट्राइक, स्मार्ट सिटी, उज्वला गॅस, नमामि गंगे, आयोध्या राम मंदिर, मेक इन इंडिया हे राष्ट्रीय स्तराचे विशेष त्याच बरोबर भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांचे व्हिजन 2020 या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील संविधान भवन, डियर सफारी पार्क, छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा (भोसरी), ललित कला अकादमी, नमामि इंद्रायणी यासारखी विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, याकरिता विजय तीन स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 10000 , द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 7000 ,तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 5000 देण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांचे केक दिनांक 16 आणि 17 ऑगस्ट रोजी मोशी ग्रँड हॉटेल येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करत प्रत्यक्षरीत्या प्रदर्शित केले जाणार आहेत.