शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज शिल्प शहरातील सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र २ मधील विनायक नगर, बो-हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर माई ढोरे यांनी केली त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्या सारिका सस्ते, अश्विनी जाधव, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उप अभियंता जयवंत जाधव, कनिष्ठ अभियंता हेमंत घोड उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प संपूर्ण ब्राँझचे असून प्रसिध्द शिल्पकार राम सुतार हे शिल्प तयार करीत आहेत. या शिल्पाची उंची १०० फूट असून ४० फूट उंच चौथ-यावर तो बसविण्यात आहे. हे शिल्प पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडेल. हा प्रकल्प सुमारे ६.५ एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ४५ कोटी खर्च अपेक्षित आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी दिल्या.