पिंपरी : दिनांक १५ ऑगस्ट २०२१ : विद्यार्थीदशेत असतानाच सर्वांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार केल्यास त्याचा पुढील आयुष्यासाठी निश्चितच लाभ होतो असे मत सीएनएच इंडस्ट्रिअल प्रा. लि. च्या मनुष्यबळ व्यवस्थापिका, शितल साळुंखे यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएस येथे ध्वजारोहण सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीतून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाची अमृत महोत्सवाकडे वाटचाल होत असताना प्रत्येकाने स्वतःची जीवनशैली आरोग्यपूर्ण कशी करता येईल यादृष्टीने नियोजन करावे असे सांगत व्यवस्थापनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी करिअरचे नियोजन करताना आरोग्याच्या व्यवस्थापनाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे आवाहन करत शीतल साळुंखे यांनी त्या स्वतः देखील नोकरीतील कामाच्या व्यापातून वेळ काढत सायकलिंग,बाईक रायडिंग व क्रिकेट अशा क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतात व त्यात विशेष प्राविण्य देखील कशाप्रकारे प्राप्त केले आहे हे स्वानुभव सांगितले.
या प्रसंगी यशस्वी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या लेख, कविता व चित्रे अशा साहित्य कलागुणांना वाव देणाऱ्या ‘यशोगाथा’ या विशेषांकाचे प्रकाशन शीतल साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच यशस्वी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, मकरंद कुलकर्णी,संचालक – ऑपरेशन्स विभाग यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स,मनीषा खोमणे, हेड एच आर – यशस्वी ग्रुप,डॉ. सुनिता पाटील,अधिष्ठाता –यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स,संजय छत्रे, संचालक-यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स, कृष्णा सावंत – उपाध्यक्ष ऑपरेशन्स विभाग -यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
एरव्ही मोठ्या संख्येने साजरा होणारा हा कार्यक्रम यंदा मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित उपस्थितीसह संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन शर्मा यांनी केले.