शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
२१२, पर्वती विधानसभा मतदार संघामधील मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु छायाचित्र नसलेल्या उर्वरीत मतदारांची संख्या २२ हजार १६२ इतकी आहे. अशा मतदारांनी ३१ ऑगस्ट पर्यंत आपली छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय २१२, पर्वती विधानसभा मतदार संघ, पुणे, दुसरा मजला, बाबुराव सणस क्रीडांगण, सारस बागेजवळ, पुणे-३०. येथील कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली, यांचेकडील पत्र क्रमांक २३/२०२१ ERS (Vol-II) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, (म.रा.) मुंबई यांचेकडील क्रमांक ईएलआर / २०२१ प्र.क्र.३९०/२१/३३ दि. ४ ऑगस्ट २०२१ पत्रा प्रमाणे दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून त्याची अंमलबजावणी २१२, पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये सुरु झालेली आहे.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दि ४ ऑगस्ट २०२१ चे पत्राप्रमाणे दि १ जानेवारी २०२२ चे अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरु झाला असून त्यानुसार दि ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे इं, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी / पडताळणी करणे, योग्य प्रकारे विभाग / भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण करून एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करावयाची आहे.
या मतदार यादीमध्ये दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणा-या सर्व पात्र मतदार यांनी आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता त्याचप्रमाणे ज्या मतदारांना मतदार यादीतून नांव वगळायचे आहे, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करुन घ्यावयाचा आहे. किंवा एकाच मतदार संघात एका भागातून दुस-या भागात नांव स्थानांतरीत करायचे आहे, त्यांनी आपला अर्ज मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन www.nvsp.in या संकेतस्थळावर जाउन आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. तसेच नमुना ६,७,८,८ अ आवश्यकतेनुसार मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. २१२ पर्वती विधानसभा मतदार संघात आगामी महानगरपालीका निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांनी आपले नांव मतदार यादीत तपासून पहावे. नांव आढळून न आल्यास नमुना क्र. ६ सर्व आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात सादर करावा.
२१२, पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्राविना मतदार यादीमध्ये असणाऱ्या २२ हजार १६२ मतदारांचे नावांची यादी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे वेबसाईट pune.nic.in, pune.gov.in या संकेत स्थळावर तसेच पुणे महानगरपालिका पुणे यांच्या punemuncipalcorporation यासंकेतस्थळाच्या होमपेजवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे फेसबुक, यू-टयुब, ट्विटर या समाज माध्यमांवर मतदार संघाचे खात्यावरुन समायीक करण्यात आलेली आहे.
मतदार यादी शुध्दीकरण करण्याकरीता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यत अधिकाधिक मतदारांची छायाचित्र जमा करणे क्रमप्राप्त आहे. विहीत कालावधीनंतर मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मा. मुख्य निवडणूक, अधिकारी, (म.रा.) मुंबई यांचेकडील मार्गदर्शक सूचनांनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून जे मतदार छायाचित्र जमा करणार नाहीत अशा उर्वरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहेत याचीही नोंद घ्यावी व मतदार यादी शुध्दीकरणाचे कामात सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही आवाहन 212, पर्वती विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सुरेखा माने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.