शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड मनपा मध्ये आज स्थायी समिती दालनात अँटी करप्शन ब्युरो च्या पथकाने धाड टाकली स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे पी ए पिंगळे व त्यांचे कर्मचारी यांना ताब्यात घेतले या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना भाजपच्या या भ्रष्टाचारी कारभारावर ताशेरे ओढले आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले की आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अँटी करप्शन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असून ना खाऊंगा ना खाने दुंगा हे उद्घोषक वाक्य देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याने थोडी नैतिकता शिल्लक असेल तर भाजपा नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा. तसेच घडलेल्या प्रकाराची सर्वांगीण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी राज्य शासनाकडे केली आहे. ताब्यात घेतलेले अधिकारी पदाधिकारी यांच्यामागे नेमका कुणाचा आधार होता हे शोधणे गरजेचे असून याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात. चौकशीअंती लवकरच सत्य बाहेर येईल; घोषणांचा पाऊस पाडून सत्तेत आलेल्या भाजपाने पदाचा गैरवापर करून शहरातील जनतेच्या पैशाची जी लूट चालवली होती याचा पुरावा आज शहरातील जनतेला मिळाला आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा या लोकांनी घात केल्याचे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. खोटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतलेल्या या लोकांमुळे सर्व बाजूंनी शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून, धाडस दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व लाचलुचपत विभागाचे मी कौतुक करतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागच्या 4 – 5 वर्षाच्या भ्रष्ट कारभार व खोटारडेपणा या विषयावर उद्या सकाळी ठीक बारा वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून सविस्तर मत आपणासमोर व्यक्त करणार आहे.
*आमदार अण्णा बनसोडे*
पिंपरी विधानसभा