शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लावण्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलामध्ये मारेल अशा प्रकारचे वक्तव्य नारायण राणे यांनी केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, एका सन्माननीय मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करून संपूर्ण 12 कोटी जनतेचा अपमान केला आहे. या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली आहे. दंगली होण्याची शक्यता आहे. या दंगली होऊ नयेत, महाराष्ट्रात अराजकता माजू नये म्हणून नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावे, असेही दिलेल्या निवेदनात माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.
सदर निवेदनावर पिंपरी विधानसभा माजी आमदार गौतम चाबुकस्वार, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, संघटक माधव मुळे, अल्पसंख्यांक शहरप्रमुख हाजी दस्तगीर मणियार, उपशहर प्रमुख अमोल निकम, विभाग प्रमुख सय्यद पटेल यांच्या सह्या आहेत.