नगरसेविका जयश्री गावडे यांचे अट रद्द करण्यासाठी आयुक्तांना निवेदन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव झालेल्या विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. मात्र, हे अर्थसहाय्य पदरात पाडून घेण्याकरिता विधवा महिलांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न व वयाची अट जिकरीची ठरत आहे. नगरसेविका जयश्री गावडे यांनी या अटीला हरकत घेतली असून सबंधित अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेचा महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत कोरोना प्रादुर्भाव विधवांसाठी अर्थसहाय्य योजना राबवित आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट व वयाची अट बंधनकारक केली आहे.
शहरातील नागरिकांकडून कोट्यावधी रुपये पालिकेला करस्वरुपात मिळतात, असे असताना कोरोना काळात सर्वच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे याचाही विचार महानगरपालिकेने करावा त्याचप्रमाणे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे विधवा झालेल्या महिलांना योजनेतील अटींची पूर्तता करता न आल्यास लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. कुटुंबातील व्यक्ती म्हणुन पालिकेने या विधवांचा विचार करावा. योजनेतील उत्पन्नाची व वयाची अट रद्द करावी. कोरोना प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या सर्व महिलांना आर्थिक आधार प्राप्त करून द्यावा, असे या निवेदनात जयश्री गावडे यांनी म्हटले आहे.