शबनम न्युज | मावळ
मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील शिरदे,उकसान, गोवित्री, करंजगाव या गावात सुरु असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास आज आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांना दाखले, रेशनकार्ड आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते देण्यात आले.
या अभियानामुळे नागरिकांना आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शिरदे सारख्या दुर्गम भागातील गावात अनेक नागरिकांकडे आधार कार्ड नाहीत. त्या गावात नेटवर्कची समस्या असल्यामुळे आधार कार्ड नोंदणी करण्यास समस्या येत होती. ज्यांचे आधार कार्ड नाही त्या सर्व नागरिकांना लवकरच गाडीची व्यवस्था करून वडगाव येथील कार्यालयाद्वारे आधार कार्ड नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कारण आधारकार्डा शिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशी मूलभूत कागदपत्रे असणे गरजेचे आहे. हे या अभियानामुळे निदर्शनास आले. अभियानात सहभागी झालेले संजय गांधी समिती सदस्य, सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई कदम, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, मा.सरपंच दत्तात्रय पडवळ, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच आजी माजी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.