पिंपरी, दिनांक ३ सप्टेंबर २०२१- सध्या कोरोना निर्बंध शिथील झाल्याने शहरात लग्नसराई व इतर कार्यक्रम सुरु आहेत. त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात त्यामुळे रस्त्यांवर देखील वाहतुक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. याकरिता पोलिस प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी विनंती महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे यांनी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांचेकडे केली.
विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली कोरोना-१९ चे अनुषंगाने करणेत येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विनंती केली. बैठकीस पुणे जिल्हयातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पुणे यांचेसह पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री.राजेश पाटील व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी मजूर अड्डा तसेच झोपडपट्टी परिसरामध्ये फेरीवाले जातात ब-याच वेळा ते मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येते. महानगरपालिका संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करत असून पोलिस प्रशासनामार्फत देखील यासंबंधी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वत:च्या जीविताचा विचार करुन कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच गर्दीमध्ये जाणे टाळावे असे आवाहन देखील महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरवासीयांना केले.