कौशल्य प्रशिक्षणामुळे अनेक रोजगार संधी उपलब्ध – मनोज आपटे, हेड लर्निंग अँड डेव्हलपमेंट पर्सिस्टंट सिस्टम्स
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
कौशल्य प्रशिक्षणामुळे युवकांना अनेक रोजगार संधी उपलब्ध होण्यास मदत होते,त्यामुळे युवकांनी रोजगारक्षम होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाला महत्व द्यावे असे मत पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख मनोज आपटे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचे महत्व अनन्यसाधारण असून अचूक व योग्य डेटा तत्परतेने उपलब्ध असणे ही आज सर्वच औद्योगिक, व्यावसायिक व सरकारी आस्थापनांची अत्यावश्यक गरज असून या सर्व क्षेत्रात कुशल डेटा एंट्री ऑपरेटरच्या रोजगारसंधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत .
ते शुक्रवारी चिंचवड येथील यशस्वी संस्थेच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या सभागृहात आयोजित सीएसआर अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रकल्पाचे उद्घाटन करताना बोलत होते. यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाद्वारे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० युवक युवतींना डेटा एंट्री ऑपरेटर या आयटी आयटी ईएस सेक्टर स्किल कौन्सिल प्रमाणित कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार संधी देखील देण्यात येणार आहे.
या प्रसंगी बोलताना पर्सिस्टंट फाउंडेशन सीएसआर हेड योगिता आपटे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले काम इतक्या उत्कृष्ट पद्धतीने करावे कि, आपल्या अनुपस्थितीची उणीव प्रकर्षाने जाणवायला हवी, तसेच मी अमुक अमुक नेमून दिलेलेच काम करणार अन्य काम करणार नाही असा संकुचित विचार न ठेवता जमेल ती सर्व कामे करत मल्टी टास्किंग होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षणार्थ्यांना स्टडी मटेरिअल किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील यांच्यासह संस्थेचे प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी तर आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.