पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती देण्यासोबतच पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महाराष्ट्राचे वैभव ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कात्रज येथे आयोजित महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, गिरीष बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या उषा उर्फ माई ढोरे,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, सांस्कृतिक वारसा आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासोबतच आर्थिक प्रगतीतही महाराष्ट्र पुढे जावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्यात येईल. पुण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दोन रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवे पुणे विकसीत केल्यास पुण्यातील गर्दी कमी होईल.
दक्षिणेतील आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ व उत्तरेतील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सर्व वाहतूक मुंबईहून पुण्याला येते. ही वाहतूक सुरतलाच थांबविता येणार आहे. सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा 1270 किलोमीटरचा महामार्ग असेल. यामुळे मुंबई-पुण्याची सर्व वाहतूक कमी होईल, अशी माहितीही श्री गडकरी यांनी दिली.
मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. हा ग्रीन महामार्ग आहे. याची सध्याची लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे. ती कमी होऊन १२७० किमी होईल. म्हणजेच या रस्त्याची महाराष्ट्रातून जाणारी 500 किलोमीटर लांबी कमी होणार आहे. यामुळे नवीन दिल्ली-चेन्नई प्रवासात 8 तासांची बचत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्री गडकरी यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार म्हणाले, रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजनामुळे, शहरातील, रस्ते वाहतूक, दळणवळण गतिमान होण्यास, व्यापार, उद्योगधंद्यांना मदत होऊन, विकासाची गती वाढण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे. कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कात्रज परिसरात सहा पदरी उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. या उड्डाणपूलाने वेळ व इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. कात्रज भागातील वाढते नागरिकरण विचारात घेत हा पुल दुहेरी केल्यास तर वाहतुकीसाठी अधिक फायद्याचा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
पुण्यासह संपूर्ण राज्यातील रस्तेविकासाला नवी दिशा आणि गती देण्याचे काम केंद्र शासनाच्या सहकार्याने करू, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्यातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी काही राज्यमार्गांचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर करता येईल. त्याबाबतही लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच राज्याच्या रस्ते विकासाच्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे म्हणाल्या, पुणे महानगरातील प्रदुषणाबाबत पर्यावरणावर काम करणाऱ्या काही संस्था आहेत. त्यांचे सहकार्य घेण्यासाठी संवाद साधावा. हवा, पाणी, जमीन सर्वच मुल्यांना घेवून जिल्हानिहाय आढावा घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. कात्रज परिसरासाठी हा उडडाणपुल महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तसेच खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी सर्वश्री आमदार भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, दिलीप मोहिते, श्रीमती माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, रस्ते वाहतुक विभागाचे मुख्य अभियंता राजीव सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी उपस्थित होते.