शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कायनेटिक मोटर्स आणि टाटा मोटर्सला भेट दिली. यावेळी, राज्यात विजेवर चालणाऱ्या गाड्यांसंदर्भातील धोरण म्हणजेच इलेक्ट्रीक व्हेकल पॉलिसीअंतर्गत काही धोरणं निश्चितीसाठी पहाणी सुरु असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले कि, राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रीक व्हेकल घ्याव्यात यासाठी महाराष्ट्रातील ठराविक कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. त्यामधीलच ही एक भेट आहे . ही व्हेकल मार्केटमध्ये आल्यानंतर किती लोकांना प्रोत्साहित करू शकेल? किती लोक घेऊ शकतील याबद्दल चर्चा झाली आहे. प्रदूषण खूप वाढत असल्याने इलेक्ट्रीक व्हेकलला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. या कंपन्यांसोबत चर्चा करुन जास्तीत जास्त इलेक्ट्रीक गाड्या लोकांना विकत घेता येण्यासंदर्भात सरकार आणि या कंपन्यांमध्ये काही ठोस करार होऊ शकतात. दिल्लीमध्ये यापूर्वीच असे इलेक्ट्रीक व्हेइकल धोरण लागू करण्यात आलं आहे. या धोरणामध्ये इलेक्ट्रीक गाड्या घेणाऱ्यांना अनुदान दिलं जातं आहे. असाच निर्णय महाराष्ट्रातही घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया संबंधित खात्यांकडून नोंदवण्यात आलेली नाही.
- राज्यात सध्या सुमारे ४० हजार विद्युत वाहने आहेत. आता विद्युत वाहनांच्या उत्पादनाला, खरेदीला व दैनंदिन वापरासाठीच्या चार्जिंग केंद्रांना अशा सर्व पातळीवर सवलती व अनुदान हे या धोरणाचे वैशिष्टय़ आहे. विद्युत रिक्षा, विद्युत टॅक्सी यांना परवान्याची गरज असणार नाही.
- तसेच ओला, उबरसारख्या टॅक्सीसेवा आणि घरपोच सेवांसाठी विद्युत वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. केवळ चारचाकी नव्हे तर दुचाकी विद्युत वाहनांनाही गटनिहाय १५ हजारांपेक्षा अधिक अनुदान देण्यात येणार आहे.
- तसेच मुंबई महानगर प्रदेश व पुणे महानगर प्रदेश या परिसरांत अधिकाधिक चार्जिग केंद्र लवकर सुरू होतील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या केंद्रांना वीजदरात सवलत देण्यात येणार आहे.
असे नवीन धोरण असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.