शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
कोरोना विषयक नियम पाळून महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३९ वा वर्धापन दिन ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. त्या निमित्ताने महापालिकेच्या दिवंगत मधूकरराव पवळे सभागृह येथे वर्धापन दिनानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, रविकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, विजय थोरात, सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सह शहर अभियंता संदेश चव्हाण, कर्मचारी महासंघाचे सुप्रिया सुरगुडे, गोरख भालेकर, गणेश भोसले, योगेश रसाळ, योगेश वंजारे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून उत्कृष्ठ कामकाज करणा-या सामाजिक कार्यकर्त्याचा कोवीड योध्दा म्हणून सन्मान करावा, महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. कोरोना काळात काम करणा-या सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात यावा, कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपणा-या स्वयंससेवकांचा देखील सत्कार करण्यात यावा. शहरातील कष्टकरी व कामगार महिलांकरीता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासाठीचे नियोजन वर्धापनदिनापासून करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके बैठकीत म्हणाले १९४७ चा स्वातंत्र्य सोहळा ज्यांनी पाहिला अशा भाग्यशाली नागरिकांना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात यावे, महानगरपालिका सर्वसाधारण सभेने नुकताच याबाबत ठराव देखील केलेला आहे. शहरातील गुणवंत कर्मचारी, खेळाडूंचा, उच्चपदावरील व्यक्ती, सामाजिक संघटनेमधील उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्तींना देखील सन्मानित करण्यात यावे असे सांगून त्यांनी नागरिकांची शहराबद्दलची भविष्याची प्रतिमा काय असेल तसेच कच-याचे वर्गीकरण या विषयावर १२ वी च्या पुढील विद्यार्थ्यांकडून तसेच जेष्ठ नागरिकांकडून त्यांच्या सूचना व कल्पना घेण्यात याव्या याबाबत सूचना केल्या.
स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी महानगरपालिकेचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांचे चरित्र असलेले पुस्तक सत्कार प्रसंगी वाटप करावे अशा सूचना केल्या.
आयुक्त राजेश पाटील यांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठीची मोहिम ११ ऑक्टोबर महापालिका वर्धापनदिनी सुरु करावी तसेच भविष्याचा वेध घेणारे चर्चासत्र आयोजित करावे. प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील कामकाजाचा पुढील १० वर्षाचा आराखडा तयार करुन त्याचे सादरीकरण वर्धापनदिनी करावे. उत्कृष्ठ कामकाज करणा-या गुणवंत कर्मचा-यांचा सत्कार करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनास दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.