शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात मोठा दिलासा दिला आहे. दि. ३० सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांना त्यांच्या विभागातील रिक्त जागांची माहिती देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. ३० सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार एमपीएससीकडून १७ संवर्गातील २९० पदांची जाहीरात काढण्यात आली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर केवळ चार दिवसांत एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे अजित पवार यांच्या कार्यतत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला आला आहे.
अजित पवार म्हणजे कामांचा धडाका…. बघतो, पाहतो, करतो…. अशी शाब्दिक मलमपट्टी न करता थेट काम तडीस नेणारे नेते म्हणून अजित पवार यांची राज्याला ओळख आहे. एमपीएससीचे सदस्य नेमण्यापासून ते रिक्त जागांची जाहिरात काढण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अजित पवार यांनी रोखठोक भूमिका घेतली. दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला. आज आयोगाने रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यातील सर्व एमपीएसी विद्यार्थ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे. एमपीएसीचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी आता अधिक जोमाने अभ्यासाला लागेल. राज्यातील एमपीएससीचा प्रत्येक विद्यार्थी आज अजित पवार यांचे आभार मानत आहे.
एमपीएससी पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून पूर्व परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे.
उपजजिल्हाधिकारी १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६ , गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५ , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४ पदांसाठी राज्य सेवा परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आली आहे.