राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना टोला
– महविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा
पिपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही मात्र अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका. यांचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी लगावला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आर्यन खान, जरंडेश्वर साखर कारखाना, आगामी महापालिका निवडणुक यावरील प्रश्नांवर उत्तर देताना, महाविकासआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पाटील यावेळी म्हणाले की, मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले.
**
जरंडेश्वर कारखान्यात मनी लॉड्रींग…
अजित पवारांच्या विधानाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “६४ कारखाने विकले गेले आहेत तर त्याची चौकशी करा, आम्ही कोणाला अडवलं नाही. जरंडेश्वरचा विषय वेगळं आहे. हा कारखाना ईडीच्या चौकशीच्या अंतर्गत आहे. ईडी चौकशी कोणाची करते? जिथे मनी लॉड्रींग होते. अशी प्रकरणं असलेल्यांची चौकशी करा. ६४ कारखान्यांचा विषय वेगळा आहे. ते कमी किंमतीत विकले गेलेत. ते कमी किंमतीत का विकले गेले? याची चौकशी राज्य सहकारी बँकेची चौकशी केली पाहिजे. त्याचे डायरेक्ट म्हणून अजित पवार यांची देखील चौकशी केली पाहिजे. मनी लॉड्रींग म्हणजे तुम्हाला मिळालेली कॅश ही तुम्ही व्हाईटमध्ये कन्व्हर्ट करणे, फेक कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या कारखान्यात आणणं. जरंडेश्वरचा कारखाना हा त्या गटात आहे.” असं सांगितलं.