शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावे, अशी मागणी कामगार नेते कैलास कदम यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात कैलास कदम यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभागांमध्ये जवळपास सोळाशे हून अधिक कंत्राटी कामगार हे रस्ते साफसफाईचे काम करीत आहेत. महानगरपालिकेची स्वच्छतेची जबाबदारी सर्वस्वी या सफाई कामगारांनी घेतलेली आहे. असे असले तरी सफाई कामगारांच्या बरोबर अन्यायाची भेदभावाची भूमिका महापालिकेने घेतलेली दिसून येते आहे. कंत्राटी ठेकेदार पद्धतीचा अवलंब करून साफसफाईचे काम करून घेण्यासाठी हजारो कामगार काम करीत आहेत परंतु त्यांना मिळणारा कामाचा मोबदला हा त्यांच्या कामाचे स्वरूपापेक्षा अत्यंत अल्प व कमी आहे. तसेच त्यांना मिळणारा कामाचा मोबदला हा अल्प असून वेळेवर मिळत नाही तसेच अल्प मोबदला पगार मिळत असून ठेकेदाराकडून फक्त अर्ध्या पगाराची तरतूद केली जाते. तसेच कोणत्याही कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. उदा.किमान वेतन कायदा, बोनस कायदा, पी.एफ, ईएसआयसी चे तंतोतंत पालन केले जात नाही.
अशा सर्व कारणांमुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. तसेच कुटुंबांचे संगोपन करणे अतिशय कठीण झाले आहे. कोरोना काळात निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांवर आर्थिक बोजा वाढत आहे ऐन सणाच्या वेळेवर त्यांना बोनस देण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना महापालिकेकडून करण्यात आली नाही. महापालिकेतील घंटागाडी कामगारांना चाळीस हजार रुपये बोनस देण्याबाबत स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु इतर सफाई कामगारांना बोनस दिला जात नाही. हा भेदभाव व कामगार कामगारांमध्ये होत असून तो थांबविण्याकरिता त्वरित कायदेशीर आदेश काढून सर्वांना न्याय मिळवून द्यावा, तसेच असे वाटते की आपण या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिवाळी सण आपली सफाई कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देण्याची घोषणा करून सर्व कामगारांना दिलासा द्यावा, असेही दिलेल्या निवेदनात कामगार नेते कैलास कदम यांनी म्हटले आहे.