शबनम न्यूज | दापोली
दापोली | प्रतिनिधी
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाच्या पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दापोली येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना बोलता यावे आणि त्यांच्या भावना लक्षात याव्यात यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आहे. आपल्या कार्यकारिणीचा विस्तार आपणच करायला हवा. बुथ वर वेगवेगळी टीम न करता एकच टीम कार्यरत राहावी यासाठी प्रयत्न करा. या मतदारसंघात आपली ताकद निर्माण करण्यासाठी तळागाळात काम करायला हवे, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
तसेच ते म्हणाले, “आता आगामी काळात अनेक निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि इथले संघटन मजबूत करायला हवे.”
केंद्र सरकारच्या चुकीच्या कामांविषयी लोकांमध्ये प्रबोधन करा. बुथ कमिट्या या पक्षाचा बुरुज आहे. हा बुरुज मजबूत ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम हे सर्वांपेक्षा अधिक वेगाने आहे. जर हाच वेग कायम ठेवला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या मतदारसंघात फडकेल, असा विश्वास मा. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आज परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. कोविड असेल, महापूर असेल या संकटाच्या काळात सरकार चांगले काम करत आहे. आदरणीय पवार साहेबांनी या भागात दौरा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना फोन केला तेव्हा तत्काळ सरकारतर्फे पॅकेजी घोषणा केली, अशी महाविकास आघाडी सरकारच्या उत्तम कामाची जाणीव मा. सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. या भागात महाविकास आघाडीचा धर्म लक्षात घेत मित्र पक्षाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पूर्णपणे करत आहे आणि पुढेही करत राहील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, रायुकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रायुकाँ कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार संजय कदम, रत्नागिरी निरीक्षक बबन कनोजे, रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण, महिला निरीक्षक संगिता साळुंखे, कोकण विभागीय विद्यार्थी अध्यक्ष किरण शिखरे, युवक अध्यक्ष योगेश शिर्के, युवती अध्यक्ष दिशा दाभोळकर, अजय बिरवटकर, चेतन दळवी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.