शबनम न्यूज :- पुणे (दि.१७ नोव्हेंबर ) :- सहकार चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर खासगी उद्योसमूहांशीदेखील सहकार क्षेत्र उत्तम स्पर्धा करू शकेल. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केल्याने ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी यांनी आज केले.
भारतात दुग्धक्रांती करून भारताचे जगात दूध उत्पादनात अव्वल स्थान निर्माण करणारे डॉ. वर्गिस कुरियन यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ‘अमूल’ची 75 वर्षे या निमित्त पुण्यात अमूल (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि.), व्हॅम्नीकॉम आणि कात्रज डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘सहकार-ग्रामीण विकासासाठी मोठी शक्ती’ या विषयावर प्रादेशिक पातळीवर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटन करताना डॉ. सोधी बोलत होते.
पुणे विद्यापीठाजवळील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (व्हॅम्नीकॉम) येथे झालेल्या या चर्चासत्राचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. तसेच डॉ. वर्गिस कुरियन यांच्या छायाचित्रास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी व्हॅम्नीकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी दूध उत्पादन, पुरवठा यंत्रणा व अन्य आवश्यक बाबींचे महत्त्व विषद केले. तसेच त्यांनी ‘फार्मर्स बिझनेस स्कूल’च्या धर्तीवर डेअरी बिझनेस स्कूल या नव्या प्रकल्पाची माहिती देऊन म्हटले की, ‘यामुळे दुग्ध उत्पादन व्यवसायाला भविष्यात मोठे बळ मिळेल तसेच शेतकर्यांना दूध उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यासंदर्भातही अधिक चांगले मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य उत्पादनांसाठीदेखील असे मॉडेल उपयोगी पडू शकेल’, असे त्या म्हणाल्या.
सहकार भारतीचे संस्थापक सतीश मराठे यांनी ग्रामीण भारताची अधिक चांगली प्रगती होण्यासाठी सहकार चळवळ अतिशय महत्त्वाची आहे असे नमूद करून म्हटले की, ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत रुजलेल्या सहकार चळवळीला आर्थिक पाठबळ देणार्या संस्थांचे जाळेही तेवढेच महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण करून श्री. अमित शहा यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. देशातील सहकार चळवळ एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आखणी करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक भारत काकडे यांनी डॉ. वर्गिस कुरियन यांच्या कार्याचा गौरव करून भारतात धवलक्रांती त्यांच्यामुळे रुजली असा उल्लेख करून देशातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्यासाठी केवळ सहकार चळवळच मोठी विधायक भूमिका निभावू शकेल असे म्हटले.
महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युर्सस कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सहकार चळवळ सातत्यपूर्ण विकसित व बळकट होत राहावी यासाठी पायाभूत सुविधा आणि आर्थिक भांडवल यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कात्रज डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दूध उत्पादन क्षेत्राचा आढावा घेऊन या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राला पुरवठा व अन्य क्षेत्रात करोना कालावधीत आलेल्या अडचणींचा आढावा घेतला.
विकास अन्वेषचे संचालक संजीव फणसळकर यांनी सहकारी दुग्ध व्यवसायाला अधिक बळकटी येण्यासाठी भांडवल उभारणीचे महत्त्व सांगितले.
विकास अन्वेषचे संशोधन व विकास सल्लागार अजित कानिटकर यांनी शेतकरी, तंत्रज्ञ व ज्ञानसंपदा संस्था यांनी एकत्र येऊन आजचे ‘अमूल’ कसे विकसित केले ते सांगितले.
प्रारंभी अमूलचे महाराष्ट्र-गोवा विभागाचे विभागीय व्यवस्थापक अतुल सुरू आणि शाखा व्यवस्थापक कुमार निलाभ यांनी सर्वांचे डॉ. कुरियन यांच्या फोटोची फ्रेम देऊन स्वागत केले. या कार्यक्राचे सूत्रसंचालन श्रुती टाकळखेडे यांनी केले. या पुण्यात झालेल्या चर्चासत्राचे लाइव्ह वेबिनार आणि फेसबुक लाइव्ह केले गेले. त्यामध्ये महाराष्ट्रातील ‘अमूल’ जीसीएमएमएफचे तंत्रज्ञ व अधिकारी, व्हॅम्नीकॉमचे विद्यार्थी, इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद (गुजरात), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी (उदगीार)चे विद्यार्थी असे सुमारे 500 ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी डॉ. वर्गिस कुरियन यांच्यावरील चित्रफीतही दाखवली गेली. ‘अमूल’चे अकाउंट्स कमर्शियलचे विभागीय व्यवस्थापक (महाराष्ट्र-गोवा) आनंद चहांदे यांनी या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.