भोसरीत खेळ रंगला पैठणीचा लांडगे यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी । प्रतिनिधी
माझा राजकीय प्रवास तुमच्या कोणालाही लपला नाही. काही माणसे अशी असतात जी आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या सोबत असतात. आतापर्यंत तुमच्या साक्षीने माझा यशस्वी प्रवास सुरू आहे आणि तुमच्या साथीने हा प्रवास प्रबळ होणार आहे अशा भावना भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी फुगे कुटुंबियांबद्दल व्यक्त केल्या. निमित्त होते ते महेश लांडगे यांच्या जन्मदिनानिमित्त सामजिक कार्यकर्ते प्रज्योत फुगे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे.
भोसरीतील खंडोबा माळ कॉर्नर, फुगे प्राइमा येथे गुरुवारी (दि.१८) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पूजा महेश लांडगे, विजय फुगे, सतीश फुगे, बाळासाहेब गव्हाणे, सोनाली गव्हाणे, सागर लोंढे, भीमा फुगे, सतिश भाऊ सोनाली गव्हाणे , भिमा गवळी , नम्रता लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले, फुगे परिवाराचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांनी नेहमीच मला साथ दिली आहे. तुमच्या सर्वांच्या साथीनेच माझा राजकीय-सामाजिक प्रवास सुरू आहे. आणि समाजासाठी सुरू असणारा हा प्रवास फुगे कुटुंबियांसारख्या माझ्या हितचिंतकांच्या जोरावर असाच अविरत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे जन्मदिनी आलेल्या जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून लांडगे यांनी नागरिकांना अवयव दान करण्याचे आवाहन केले. अवयव दान केल्यामुळे आपण मरणोत्तरही समाजाच्या कामाला येतो. यामुळे अवयव दान श्रेष्ठ दान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महेश लांडगे म्हणजे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. भोसरीतील आमच्याच नाहीतर प्रत्येक कुटुंब आणि व्यक्तीसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे आणि राजकारणाच्या पलीकडचे नाते आहे. कोणत्याही वेळी कोणत्याही मदतीसाठी तात्काळ सज्ज असणारा लढवय्या माणूस म्हणजे महेश दादा लांडगे आशा भावना व्यक्त करत प्रज्योत फुगे व कुटुंबीयांनी आमदार लांडगे यांना शुभेच्छा दिल्या.
>>>>>
पैठणीचा खेळ रंगला..
दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमांस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालिका तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकर या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण ठरल्या.
सोन्याची नथ, मानाची पैठणी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारखी अनेक बक्षिसे यावेळी विजेत्या महिलांना देण्यात आली. परिसरातील शेकडो महिलांनी यावेळी कार्यक्रमाचा आनंद लुटत आयोजनाबद्दल फुगे किटुंबियांचे आभार मानले.