शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (२२ नोव्हेंबर ) :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील बारणे कॉर्नर ते तापकीर चौक दरम्यान मुख्य रस्त्यावरील असणाऱ्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी सहाय्यक आयुक्त, आकाशचिन्ह विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 23 मौजे थेरगाव मी प्रतिनिधित्व करीत असून, माझ्या प्रभागात दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील दुकानांची फलकांसह गोरगरिबांच्या हात गाड्या उचलून नेल्या असून बारणे कॉर्नर ते तापकीर चौक दरम्यान मुख्य रस्त्यावरील असणाऱ्या दुभाजक यामध्ये उद्यान विभागाने सुशोभिकरण केले असून, यामध्ये बांधकाम विकासकाने फलक लावले असून त्यासाठी आकाशचिन्ह विभागामार्फत महानगरपालिका अधिनियमानुसार परवानगी घेतली आहे का? घेतली नसेल तर महानगरपालिका आकाश चिन्ह विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? आकाश चिन्हांची विभागाचे संबंधित विभागाचे सक्षम अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पाहणी करण्यासाठी फिरत नाहीत का? असा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला पडलेला असून तात्काळ कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या विभागामार्फत संबंधित दुभाजकावर लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई करण्यात यावी, असेही सदर निवेदनात नगरसेविका मनिषा पवार यांनी नमूद केले आहे.