स्वप्न राष्ट्रवादीचे श्रेय लाटतायेत भाजप – नगरसेविका मंगला कदम
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रण न देता शाहू सृष्टी व फुले सृष्टीचे भूमिपूजन करण्याचे नियोजन भाजपा करीत आहे. हे सर्वथा चुकीचे आहे. असे मत पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर चिंचवड येथील शाहू सृष्टी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. सन 2016 रोजी शाहू सृष्टीच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. सुमारे 1 कोटी 80 लाखांचे काम सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे 7 कोटी 46 लाख मंजूर करण्यात आले आहेत. फुले सृष्टीची भूमिपूजनाचा कार्यक्रम मा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप पक्ष मार्फत करण्यात येत आहे. सदर भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत पालकमंत्र्यांना रीतसर निमंत्रण दिले गेले नाही. अथवा निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेली नाही. किंवा बोलणे झाले नाही. तसेच एखाद्या प्रकल्पाचे रीतसर भूमिपूजन झाले असता, केवल श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप परत संभाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजन करीत आहे.
याप्रसंगी बोलताना नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, मागील चार वर्षात नाव घेण्यासारखे एक तरी काम भाजपने केली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसने मंजूर केलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांचे उद्घाटने करून फक्त त्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम भाजप करत आहे. आता महापालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून आम्ही शहरातील नागरिकांसाठी काम करतोय हे दाखवून देण्याचा खटाटोप चालू आहे. परंतु शहरातील जनता आता सर्व जाणून आहे. मागील चार साडेचार वर्षात काय दिवे लावले ते ओळखून आहे.
शाहू सृष्टी हा प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना मंजूर करून त्याचे काम चालू केले होते. या उलट मागील चार वर्षात या प्रकल्पाची काहीच प्रगती झाली नाही. आता निवडणुकांच्या तोंडावर या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे. या भूमिपूजनासाठी पालकमंत्र्यांना निमंत्रण न देता निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले आहे. हे सर्वथा चुकीचे आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मार्फत जाहीर निषेध करतो. तसेच सदर प्रकल्पाचे भूमिपूजन 2016 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्याने या भूमिपूजनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध राहील, शाहू-फुले-आंबेडकर ही महाराष्ट्राची दैवते आहे, याबाबत तरी भाजपने राजकारण करू नये, असेही यावेळी संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.