आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
शबनम न्युज : सातारा (दि.२३ नोव्हेंबर) :- जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवाचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला तर ज्ञानदेव रांजणे विजयी. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली. सातारा राष्ट्रवादी कार्यालय फोडल्याने येथे तणावाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये धक्कादायक निकाल लागले असून आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यमर्ती बँक निवडणुकीत एका मताने पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालाय फोडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शशिकांत शिंदे याचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पराभवामुळे दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहेत. दगडफेक केलेल्या शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिलगीरी व्यक्त करतो
शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. पराभव खिलाडी वृत्तीने मान्य करावा लागतो. तो मी मान्य केला आहे. हार-जीत होत असते. पक्षाने प्रयत्न केले. पण एका मताने पराभूत झालो. परत जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यामुळे समर्थकांकडून काही गैरप्रकार झाला असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. कार्यकर्ते भावनावश होतात. त्यातून हा प्रकार घडला असेल. त्यामुळे मी पक्षाची माफी मागतो.