प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण व युद्ध फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०२ डिसेंबर) :- 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचा शुभारंभ पुण्यातील शिवदर्शन येथील वसंतराव बागुल उद्यानात शुक्रवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रदर्शनीय टी-55 रणगाड्याच्या लोकार्पण सोहळ्याने होईल. भारतीय सैन्यदलाने हा रणगाडा पुणे महानगरपालिकेस भेट दिला आहे. याचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम) यांच्या शुभहस्ते होणार असून याचे अध्यक्षस्थान पुण्याचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ भूषविणार आहेत. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी हे प्रमुख पाहुणे असणार असून, मनपा आयुक्त विक्रमकुमार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक, मनपा अधिकारी व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारणार्या द्विसप्ताहातील या उद्घाटन सोहळ्यास पुणे महानगरपालिकेचा सहयोग लाभला आहे. घनश्याम सावंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. हा प्रदर्शनीय रणगाडा त्यानंतर नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला जाईल. हा टी-55 रणगाडा सोव्हिएत युनियनमध्ये 1963 मध्ये निर्माण करण्यात आला असून, 1965 व 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात या बॅटल टँकने मोठी कामगिरी बजावली आहे. सन 2010 मध्ये भारतीय सैन्यातून या रणगाड्याची निवृत्ती झाली.
3 डिसेंबर रोजी वरील कार्यकमानंतर बागुल उद्यानातील भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते संपन्न होईल. या फोटो प्रदर्शनात 2 फूट बाय 3 फूट आकाराची एकूण सुमारे शंभर छायाचित्रे असून, हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत दि. 3 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले असेल. तसेच याच कलादालनात या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे 27 एलईडी स्क्रीन बसवून देशातील पहिल्या अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशभक्तीपर हिंदी व मराठी युद्धविषयक चित्रपटांतील निवडक क्लिपिंग्ज यावर दाखवल्या जाणार आहेत.
‘1971 चे युद्ध’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये 500 शब्दांपर्यंत हे निबंध आबा बागुल यांचे शिवदर्शन येथील कार्यालय येथे समक्ष अथवा ppwalimbe@gmail.comn या संकेतस्थळावर 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत नाव, पत्ता व फोन क्रमांकासह पाठवावेत. यासाठी ज्येष्ठ पत्रकारांची परीक्षक समिती नेमण्यात आली असून, याचे बक्षीस वितरण 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न पं. भीमसेन जोशी ऑडिटोरियम येथे लेफ्ट. जन. राजेंद्र रामराव निंभोरकर (निवृत्त) (पीव्हीएसएम, यूएसएम, एव्हीएसएम, एसएम, बार-2, व्हीएसएम) व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते संपन्न होईल, अशी माहिती ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह संकल्पनेचे जनक पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली.