शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली.
बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मात्र, आज सतीश काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सतीश काकडे म्हणाले की, अजित पवार यांनी काही विषय मार्गी लावले आहेत व इतर सर्व विषय मार्गी लावून देतो असे आश्वासन दिले आहे. पुणे जिल्हा बँक ही जिल्ह्याचा आर्थिक कणा असल्याने त्या बँकेवर प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्या सारखा कणखर नेता असणे अत्यंत गरजेचे आहे. अजित पवार सारखे अभ्यासू नेते जर बँकेमध्ये असेल तर बँक अडचणीत जाणार नाही, असेही काकडे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मी कोणतेही पक्षांमध्ये नाही किंवा मी कोणतेही वैयक्तिक स्वार्थासाठी पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणूक अर्ज भरला नव्हता. मी आत्तापर्यंत पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करीत आलेलो असून यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करीत राहणार आहे. त्यामुळे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही व आवश्यकता नाही.