शबनम न्यूज :पुणे (दि.०९ डिसेंबर) :- राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 8 ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘लोकशाही भोंडला स्पर्धा’चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्याअंतर्गत एकल गटात आटपाडी (जि. सांगली) येथील स्मिता साळुंखे यांना प्रथम,नाशिकच्या आर्या बुडूख (मूळच्या बार्शी, जि. सोलापूर) यांना द्वितीय तर पालघरच्या श्रुतिका अडसूळ यांना तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
देशाच्या लोकशाहीत स्त्रियांची निम्मी संख्या आहे. स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ, प्रेरणास्रोत असते. कुटुंबातील स्त्रीपर्यंत एखादी गोष्ट पोहोचली, तर ती फक्त तिच्यापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण कुटुंबाला त्याच्यात सहभागी करून घेत असते. स्त्रियांची ही ताकद लक्षात घेऊन मताधिकार जागृतीसाठी ‘लोकशाही भोंडला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. लोकशाही, मताधिकार याविषयीची भोंडला गाणी हा या स्पर्धेचा विषय होता.
या स्पर्धेसाठी एकल गट आणि समूह गट अशा प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. समूह गटा अंतर्गत मुंबईच्या अंजली दिलीप यांना प्रथम, सोनाक्षी पाटील यांना द्वितीय तर ठाण्याच्या मिनल घाडगे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याशिवाय दोन्ही गटांतील स्पर्धकांसाठी एकूण दहा उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे स्वतंत्रपणे 11 हजार रुपये, 7 हजार रुपये आणि 5 हजार रुपये तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थींना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कृष्णा कला महाविद्यालय, कृष्णा शास्त्र महाविद्यालय, सातारा, नांदेडच्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते, नाशिकच्या छाया अशोक इसे, मुंबईच्या नीता चव्हाण, सांगलीच्या सुजाता पाटील ठाण्याच्या शिल्पा नातू, उज्ज्वला लुकतुके, सांगलीच्या जयश्री पेंडसे, रत्नागिरीच्या प्रेरणा प्रफुल्ल पड्यार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गत एकूण 150 प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी एकल गटात 50, तर समूहामध्ये 500 हून अधिक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या.